अपघात रोखण्यासाठी मुरुमगाव पोलिसांनी बुजवले मार्गातील खड्डे

गरोदर माता व विद्यार्थ्यांना त्रास

धानोरा : अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. गरोदर महिला, दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना प्राणही गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर मुरूमगाव पोलिसांनी पुढाकार घेत श्रमदानातून हे खड्डे बुजवण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला.

पोलीस अधीक्षक निलोत्पल व धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग आणि राहुल चौधरी यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत जवळपास 12 किलोमीटरच्या अंतरात महामार्गावरील अनेक मोठे खड्डे मुरूम व गिट्टी टाकून बुजवण्यात आले. या कामात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा सचिव रोशन कवाडकर, सीआरपीएफ ब्रावो 113 बटालियनचे अधिकारी शशीभूषण यादव, मुरुमगावचे सरपंच शिवप्रसाद गव्हना, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी, स्थानिक पत्रकार, तसेच स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या श्रमदान उपक्रमाला राहुल दुबाले, आणि गृह विभाग निराकरण समन्वय समितीच्या सदस्यांनीही सहकार्य केले.

रोशन कवाडकर यांनी खड्डेमय रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खड्डे बुजवण्याकरिता जेसीपी, ट्रॅक्टर व पाण्याची सोय करून स्वतः तिथे श्रमदानही केले. पोलीस दलाच्या या उपक्रमाचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.