देसाईगंज : नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजद्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024-25 मधील विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शैक्षणिक गुणवत्ता गौरव व पालक सत्कार समारंभ शनिवार, दि.20 सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचा शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात मा.आ.गजबे म्हणाले, “यश मिळवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांची चिकाटी आणि अभ्यासच नव्हे; तर पालकांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा असतो. शिक्षण हाच समाजपरिवर्तनाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी या यशावर न थांबता आणखी मोठी उद्दिष्टे गाठावीत,” अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मोतीलाल कुकरेजा होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आमची संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद केवळ विद्यार्थी व पालकांपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाचा आहे. अशा गौरव समारंभामुळे विद्यार्थी नव्या उंचीवर जाण्यासाठी सदैव प्रेरित होतात, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जगदिश शर्मा (अध्यक्ष, नूतन शिक्षण प्रसारक मंडळ), योगेश नाकतोडे (कोषाध्यक्ष), साधना सपाटे (सदस्य), अ.जहीर अ.हमीद शेख (सदस्य), डॉ.शंकर कुकरेजा (सदस्य), प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे तसेच प्रा.दामोदर शिंगाडे (मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) उपस्थित होते.
या समारंभात शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांची नावे व यशाची माहिती प्रा.अमोल बोरकर यांनी वाचून दाखवली, तेव्हा सभागृहातील वातावरण टाळ्यांच्या कडकडाटात भारावून गेले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.निहार बोदेले यांनी, तर आभार प्रदर्शन शिक्षक चव्हाण यांनी केले. या समारंभासाठी प्रा.डॉ.एच.बी.धोटे व प्रा.डॉ.श्रीराम गहाणे (कार्यकारी प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

































