देसाईगंज : शहरातील नझुलच्या शासकीय भूखंडावर गोंडवाना गोटूल समितीने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार प्रीती डुडूलकर यांनी नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये दिलेली मुदत दि.23 सप्टेंबरला संपली. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी हे अतिक्रमण हटविले जाण्याची शक्यता आहे. अतिक्रमण हटविणार की पुन्हा थंडबस्त्यात ठेवणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

मौजा देसाईगंज येथील नझुल खसरा क्र.24/5 मधील भुखंड क्र.16, क्षेत्र 2025 चौ.मी. जागा भारत पेट्रोलियम कॉर्पोशन लिमिटेड यांना अनुसूचित जमाती (एस.टी.) संवर्गातील व्यक्तीमार्फत पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेपट्ट्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 29/08/2017 रोजी दिली होती. मात्र त्या जागेवर गोंडवाना गोटुल भुमी समिती देसाईगंज यांनी अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी दि.23 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालयाला आदेश दिला. त्यानुसार तहसीलदार प्रिती डुडलकर यांनी हे अतिक्रमण काढण्याची सूचना करत गोटुल समितीला दिली होती. अतिक्रमण न काढल्यास दि.23 सप्टेंबर 2025 रोजी अतिक्रमण काढले जाईल, असेही आदेशात म्हटले होते.
गोटुला समितीने त्या जागेत अतिक्रमण करून बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला आहे. तसेच सिमेंटच्या 750 निशानी, काटेरी कुंपन इत्यादी काढण्याची कार्यवाही करावी, अन्यथा काहीही म्हणने ऐकुन न घेता अतिक्रमण निष्कासित करुन घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदारांनी दि. 11 सप्टेंबरला बजावलेल्या नोटीसमध्ये नमुद केले आहे. पण गोटुल समितीने ते अतिक्रमण काढले नसल्याचे समजते. त्यामुळे आता अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































