पिंपळटोल्यात हत्तींनी केलेल्या नुकसानीची आ.नरोटेंकडून पाहणी

पंचनामे व भरपाईसाठी दिले आदेश

बांधावर जाऊन पाहताना आ.डॅा.मिलिंद नरोटे

गडचिरोली : तालुक्यातील पिंपळटोला परिसरात रानटी हत्तींनी शेतात घुसून धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ.मिलिंद नरोटे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी शेतशिवारात दाखल होऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी धानपिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची व्यथा मांडली आणि लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी आमदार डॉ.नरोटे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत कृषी विभाग, महसूल विभाग, तहसील प्रशासन आणि वनविभागाने कोणतीही हलगय न करता तात्काळ संयुक्त पंचनामे पूर्ण करावेत आणि नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे सूचित करून शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, असेही सांगितले.

हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नेमावे, गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष दत्तू सूत्रपवार, गणेश दहलकर, विलास खेवले, अविनाश विश्रोजवार, दीपक सातपुते, खुशाल चुधरी व शेतकरी, तसेच प्रशासनाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.