गडचिरोली पर्यटन महोत्सवात विद्यार्थ्यांचा निसर्गाशी संवाद

गुरवळा नेचर सफारीत रमले

गडचिरोली : जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या गडचिरोली जिल्हा पर्यटन परिवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना गुरवळा नेचर सफारीत एक आगळावेगळा निसर्ग अनुभव घेण्याची संधी मिळाली.

सकाळी 7 ते 11 या वेळेत घेण्यात आलेल्या या निसर्ग शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे व जैवविविधतेची जाणीव करून देणे हा होता. सुमारे 40 विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी या शिबिरात सहभाग घेतला. जंगल ट्रेलदरम्यान झाडांची ओळख, औषधी वनस्पतींचा उपयोग, पानांची माहिती तसेच जैवविविधतेचे प्रत्यक्ष निरीक्षण विद्यार्थ्यांना अनुभवता आले. निसर्गाशी एकरूप करणारे खेळ आणि संवादात्मक उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा निसर्गाशी अधिक जवळचा परिचय झाला.

वनकर्मचाऱ्यांनी केले मार्गदर्शन

या प्रसंगी वन विभाग गडचिरोलीचे वनपाल सोरते, वनरक्षक मेश्राम तसेच गुरवळा नेचर सफारी गाईड व टायगर मॉनिटरिंग टीमचे अधिकारी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

एस.टी.आर.सी. गोंडवाना विद्यापीठाच्या टीमने या शिबिरात सहभाग घेतला. प्रमुख कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिरडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व्ही.मंजुषा, क्षेत्र समन्वयक झिनत बेगम सय्यद तसेच पारंपरिक वैद्यराज रामभाऊ राउत यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निसर्ग, वन्यजीव आणि जंगल परिसंस्थेतील परस्पर संबंधांविषयी सखोल माहिती मिळाली.

विद्यार्थ्यांचा समृद्ध अनुभव

निसर्ग शिबिराद्वारे विद्यार्थ्यांनी जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास केला, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजले आणि संवर्धनाची प्रेरणा घेतली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा निसर्गाशी अधिक सखोल व भावनिक बंध दृढ झाला.