संघाच्या शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी साजरी

पथसंचलनात अनेकांचा सहभाग

देसाईगंज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वडसा नगर शाखेचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव शनिवारी (दि.27) श्री गजानन मंदिर, माता वॉर्ड, वडसा येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात देसाईगंजमधील प्रतिष्ठित व्यवसायिक व समाजसेवक गणेश फाफट, प्रमुख वक्ते म्हणून चंद्रपूर विभाग कार्यवाह सुभाष ईटनकर, तालुका संघचालक भास्कर डाबरे, नगर संघचालक विजय ठकरानी उपस्थित होते. या कार्यक्रमासह पथसंचलनात माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

दुपारी 3 ते 4 या वेळेत एकत्रीकरण व पथसंचलनाची तयारी पार पडली. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री गजानन मंदिरापासून पथसंचलन सुरू होऊन शहरातील विविध मार्गावरून फिरत पुन्हा गजानन मंदिरात समारोप करण्यात आला. संघ स्वयंसेवकांनी शिस्तबद्धरित्या संचलन करून विजयादशमी उत्सवाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, शस्त्र पूजनाने झाली आणि प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन तसेच मान्यवरांनी आपले विचार मांडले. गणेश फाफट यांनी सांगितले की, संघ हे आजच्या समाज जीवनात एक समर्थ मूल्यसंस्था आहे. संस्कार, कर्तव्य आणि सेवाभाव रुजविण्यासाठी स्वयंसेवकांनी सदैव पुढाकार घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश यात होणे आवश्यक आहे.

प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित संघाचे चंद्रपूर विभागाचे कार्यवाह सुभाष ईटनकर यांनी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ कार्याचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि समाज बदलाची आवश्यक भूमिका अभ्यासपूर्ण शैलीत पडताळली. संघ स्वयंसेवा म्हणजे अनुशासन, राष्ट्रीयत्व, सेवाव्रती जीवन. प्रत्येक युवकाने भारतीय मूल्यांची जपणूक करावी, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, हीच विजयादशमीची प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी संघाच्या सेवा प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापन, समाजसंघटन आणि नव्या पिढीला दिल्या जाणाऱ्या नेतृत्वाच्या संधी यावर विशेष प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित स्वयंसेवक, स्थानिक नागरिक, युवा वर्ग यांनी एकत्रितपणे देशभक्ती, सामाजिक सलोखा आणि संघ कार्याचा संकल्प घेतला.