गडचिरोली : लोकनेते, माजी मंत्री स्व.दाजीसाहेब उर्फ रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जनसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॅा.प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धुळे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ.प्रकाश आमटे यांनी केले. त्यांना हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार स्मिता वाघ, डॉ.शोभा बच्छाव, मंदाकिनी आमटे, लता पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा विचार देशभर पोहोचविला. जिथे जाण्यासाठी रस्ताही नव्हता, अशा हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी मंदाकिनी आमटे यांनीही डॉ.प्रकाश आमटे यांना समर्थ साथ दिली. आमटे परिवारातील तिसरी पिढी या प्रकल्पांसाठी कार्यरत आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ.आमटे यांनी अविरतपणे हा प्रकल्प सुरू ठेवला आहे आणि पुढेही सुरू राहावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
लोकांचे सहकार्य आणि विश्वासातून वाढले कार्य- डॅा.आमटे
सत्काराला उत्तर देताना डॉ.प्रकाश आमटे म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. त्यांचे हे कार्य जगभरात पोहोचले. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात आल्यावर आम्ही दोन्ही भावांनी आनंदवनाचे कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले. भामरागड येथे बाबांसोबत भेट दिल्यानंतर आदिवासी जनतेतील कुपोषण, त्यांच्या समस्या पाहून त्यांच्या उत्थानाच्या कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची कल्पना पुढे आली. लोकांच्या सहकार्य आणि विश्वासातून हे कार्य पुढे गेले. आज अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात या परिसरातील तरुण पुढे गेले आहेत. गेली 52 वर्षे हे जनसेवेचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार अमरिश पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार दिलीप बोरसे, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.