उत्सव काळादरम्यान जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू

पाचपेक्षा अधिक जमावाला मनाई

गडचिरोली : नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू केला आहे.

हा आदेश 7 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या काळात शस्त्रास्त्रे, स्फोटके बाळगण्यास मनाई असून पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका, सभा, मोर्चे व पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.