‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत बुधवारी तपासणी

वैद्यकीय व दंत तपासणी करणार

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे बुधवार, दि.1 ऑक्टोबर रोजी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत मोफत वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

शिबिराची वेळ व ठिकाण

हे शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील बाह्यरुग्ण विभागात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. शिबिरामध्ये खालील महत्त्वाच्या आजारांबाबत तपासण्या, निदान व उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पौष्टिक आहार व पोषण जागृती

सिकलसेल, थॅलेसेमिया, अॅनिमिया व हिमोफिलिया तपासणी, मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम, दंत तपासणी व नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग तपासणी, स्वच्छता व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांअंतर्गत जनजागृती.

या शिबिरात नेत्ररोग अधिकारी, दंतचिकित्सक, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भिषक, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद व होमिओपॅथी) तसेच तज्ञ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांसाठी विशेष जागृती

शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, मातृ व बाल आरोग्य तसेच पोषण या विषयांवर विशेष भर देण्यात येईल. सर्व तपासण्या व उपचार सेवा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जातील.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन मुली, तसेच सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार – निरोगी समाज” हा संदेश आपण घराघरात पोहोचवूया, असेही त्यांनी नमूद केले.

आवश्यक कागदपत्रे

शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी विशेषतः महिलांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, आभा कार्ड व आयुष्मान कार्ड सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.