गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर यश आले आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागपूर–सिकंदराबाद ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा थांबा रामगुंडमऐवजी मंचेरियाल येथे देण्यास मान्यता मिळाली आहे.
सिरोंचा भागातील रेल्वे प्रवााशांच्या दृष्टिने हा थांबा महत्वाचा असल्याची बाब सिरोंचा येथील भाजपा बुथ कमिटी सदस्य लियाकत हुसेन शेख यांनी मा.खा.डॉ.नेते यांच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत डॉ.नेते यांनी यासंदर्भाील मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या स्वाधीन करून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मंचेरियाल येथे थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत वंदे भारतला मंचेरियालला थांबा नसल्याने सिरोंचा तालुक्यातील प्रवाशांना रामगुंडमला जावे लागत होते. त्या स्थानकावर जाण्यासाठी सिरोंचावरून थेट बससेवा उपलब्ध नसल्याने ऑटो किंवा टॅक्सीने महाग भाडे देऊन प्रवास करावा लागत होता. मात्र आता मंचेरियाल येथे नियमित बससेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार आहेत. या निर्णयामुळे सिरोंचा तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबद्द मा.खा. डॉ. नेते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तसेच या थांब्यामुळे सिरोंचा परिसरातील नागरिकांनीही डॉ.नेते यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.