गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 7 संवर्गात भरल्या जात असलेल्या 30 कंत्राटी पदांसाठी 384 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. आता त्यातून दिलेल्या निकषानुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ज्यांना जास्त गुण त्यांची निवड होणार आहे.
दि.29 आणि 30 सप्टेंबर असे दोन दिवस ही कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया जिल्हा परिषदेत सुरू होती. त्यासाठी उमेदवारांना मुळ कागदपत्रांसह पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या समोरच जिल्हा परिषदेच्या सभागृहात कागदपत्रांची तपासणी झाली. जोडलेल्या कागदपत्रांनुसार गुणांकन करून ती यादी जाहीर केली जाणार आहे.
एकूण पदांमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ञ (10 पदे), किटकशास्रज्ञ (8 पदे), स्री वैद्यकीय अधिकारी (3 पदे), एएनएम (2), जीएनएम (3), फार्मासिस्ट (2) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (2) याप्रमाणे एकूण 30 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. गुणवत्ता यादी जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ www.zpgadchiroli.maharashtra.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकपणे आणि गुणवत्तेवर आधारित होणार असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असे जिल्हा परिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाने आधीच स्पष्ट केले होते.