चामोर्शी : चामोर्शी शहरात दसरा, विजयादशमीचा उत्सव यंदा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक सोहळ्यांच्या संगमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोंड मोहल्ला येथे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या यंत्राचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते पार पडले.
नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा
पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन अडचण लक्षात घेऊन उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक “पाणी एटीएम” नागरिकांना पूर्णपणे नि:शुल्क शुद्ध पाणी उपलब्ध करून देणार आहे. नगरसेवक आशिष पिपरे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.नेते म्हणाले, “चामोर्शीतील प्रत्येक वार्डाचा विकास ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. नगरसेवक आशिष पिपरे यांच्या पुढाकारातून या भागात सभागृह, व्यायाम साहित्य, स्वच्छतागृह, क्रीडांगण आणि आता शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र अशा अनेक विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. यापुढेही नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवली जाईल,” असे डॉ.नेते म्हणाले.
दसरा उत्सवात शोभायात्रा व रावण दहन
दसऱ्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा ही या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या रूपातील मुले आणि हनुमान या शोभायात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले. डीजे व बॅण्डच्या गजरात “जय श्रीराम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर पटांगणात पारंपरिक रितीने रावण दहनाचा सोहळा उत्साहात पार पडला. आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या सोहळ्याला भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, चामोर्शी नगरपंचायतच्या सभापती सोनाली आशिष पिपरे, नगरसेवक आशिष पिपरे, बंडू नैताम यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.