
गडचिरोली : अहेरीत दुर्गा उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजवाडा निवासस्थानाच्या आवारातील दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी (दि.3) मोठ्या उत्साहात निघाली. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी मुख्य चौकात वाद्याच्या तालावर ठेका धरत नृत्य करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
या विसर्जन मिरवणुकीत आत्राम परिवारातील सदस्यांसह कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. विविध प्रकारचे वाद्यवृंद पथक हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यात आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारे पथक, व्हायोलियन वाद्यपथक, दाक्षिणात्य भागातील वाद्यवृंद अशा विविध पथकांच्या तालावर अहेरीकरांनी ठेका धरला होता. प्राणहिता नदीत रात्री विसर्जन झाले.
अहेरीत या दुर्गोत्सवादरम्यान कव्वालीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यादरम्यान अहेरी नगरीत दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाअन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. आ.धर्मरावबाबा आणि कुटुंबियांनी स्वत: भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.