अहेरी : 200 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला अहेरी इस्टेटचा दसरा महोत्सव यावर्षीही उत्साहात, तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे सहावे वारसदार अम्ब्रिशराव आत्राम यांनी पालखीतून गडअहेरी येथे जाऊन सिमोल्लंघन केले. यावेळी शमी वृक्षाचे, तसेच गडीमातेचे पूजन केले.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पालखी काढून आलापल्ली रोडजवळील तलावात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले. दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरला सकाळी साईबाबांच्या पालखीचे शोभायात्रेने शहरातून मार्गक्रमण झाले. त्यानंतर राजे अम्ब्रिशराव यांनी पालखीत बसून सायंकाळी विजयादशमीचे सिमोल्लंघन केले. यानंतर रात्री 9 वाजता रुक्मिणी महलाच्या प्रांगणात मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्यांवर बोट ठेवत तुमचा चुकीचा निर्णय दुरुस्त करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
व्यासपीठावर अवधेशराव बाबा, तसेच राजपरिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केले.

































