गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांमधील वॅार्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार याची सोडत आज संबंधित नगर परिषद कार्यालयात निघणार आहे. सकाळी 11 वाजता एकाचवेळी तीनही ठिकाणी ही सोडत प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे नगरसेवकपदाची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या संभावित उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याशिवाय पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठीही येत्या 10 आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

गडचिरोली नगर परिषदेच्या 27 नगरसेवकांसाठी नगर परिषद कार्यालयात सकाळी 11 वाजता सोडत निघेल. यात सर्वाधिक 12 वॅार्ड हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 7 आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी 4 वॅार्ड राखिव राहतील. 27 पैकी 14 जागा महिलांसाठी असतील.

देसाईगंज नगर परिषदेत 21 नगरसेवक राहतील. त्यापैकी सर्वाधिक 10 नगरसेवक हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 6, अनुसूचित जातीसाठी 4 तर अनुसूचित जमातीसाठी केवळ 1 वॅार्ड राखिव राहणार आहे. या ठिकाणी 21 पैकी 11 महिला नगरसेवक असतील.

आरमोरी नगर परिषदेत 20 नगरसेवक राहतील. त्यात सर्वाधिक 9 जण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 5, तसेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी प्रत्येकी 3 जागा राखिव राहतील. या ठिकाणी 20 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव राहतील.

निघालेल्या सोडतीवर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 9 ते 14 अॅाक्टोबरपर्यंत राहील. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे गडचिरोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी सांगितले.

नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी बराच कालावधी शिल्लक असल्यामुळे त्या ठिकाणच्या नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत नंतर काढली जाणार आहे.

पं.स.सभापतींची सोडत 10 ला
पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत येत्या 10 ऑक्टोबरला काढली जाणार आहे. ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक 17 सप्टेंबर 2025 च्या पत्रान्वये गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आरक्षण सोडत येत्या 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एकूण 12 पंचायत समित्यांपैकी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा या पाच पंचायत समित्या पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात न मोडणाऱ्या आहेत. त्यामुळे या पंचायत समित्यांतील सभापती पदांपैकी एक पद अनुसूचित जाती (महिला), एक पद अनुसूचित जमाती (पहिला), दोन पदे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, आणि एक पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या वर्गांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.











