धानोरा : तालुक्यातील रांगी आणि रांगीपासून 7 कि.मी. अंतरावरच्या कोरेगाव येथे जनावरांच्या उपचाराकरिता लाखो रुपये खर्च करुन पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले, पण दवाखान्यात कोणतेही कर्मचारी पूर्ण वेळ उपलब्ध राहात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधलेली इमारत, सिमेंट रस्ते, विहिर, पाण्याची टाकी यावरील कोट्यवधीचा खर्च केवळ कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी केला का? असा सवाल शेतकरी वर्ग विचारत आहे.

धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे पशुधन दवाखाने आहेत. या दवाखान्यांना परिसरातील रांगीसह निमगाव, बोरी, मासरगाटा, निमनवाडा, शिवागाटा ही गावे जोडलेली आहेत. या गावांतील पशुपालक उपचाराकरिता गुरे घेऊन जातात, मात्र कर्मचारीच नसतात, त्यामुळे दवाखाना कुलूपबंद असतो. कधी सुरू असला तर तिथे पशुवैद्यकिय अधिकारी नसतात. पशुधन पर्यवेक्षक नाही, शिपाईसुद्धा गायब असतो.

विशेष म्हणजे जिथे कर्मचारीच नाहीत तिथे निवासस्थान कशाला, तेही स्वतंत्र पाण्याची टाकी, आणि इतर सुविधांनी सुसज्ज, अशी ही इमारत मागील 10 वर्षापासून रिकामी पडून आहे. परिसरात लम्पी रोगाची साथ पसरलेली आहे. चौखुराच्या इंजेक्शनची गरज असताना सुद्धा पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे आहे.

डॅाक्टर म्हणतात, लसीकरणात व्यस्त

यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.मिनल सोनटक्के यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता, आम्ही नेहमी गावोगावी जाऊन लसीकरणामध्ये व्यस्त राहतो. त्यातच कोरेगाव येथे प्रभारी आणि दवाख्यान्याला शिपाई नाही. फिल्डवर्क असल्याने दवाखाना उघडायची गरज नाही, असे त्यांचे म्हणने आहे.

वास्तविक कोरेगाव येथे लंम्पी रोगाची आणि चौखुराची साथ असताना सुद्धा गावात लसीकरण झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी उपचार करावे लागत आहे, असे पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी यांनी सांगितले.












