कारमधून सु्गंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्याला अटक

देसाईगंजमध्ये एलसीबीची कारवाई

गडचिरोली : सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) देसाईगंजमध्ये कारवाई केली. यात गोंदिया जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करून तीन लाखांचा सुगंधित तंबाखू, तीन लाखांची कार आणि रोख 2 लाख 19 हजार रुपये असा एकूण 8 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार, ललीत राठी रा.अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया हा देसाईगंज हद्दीत आपल्या चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणार असल्याचा सुगावा लागला होता. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने वडसा येथील कन्नमवार वार्डकडे जाणा­ऱ्या रस्त्यावर आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ सापळा रचला. एक संशयित ग्रे रंगाची मारोती कंपनीची इको चारचाकी वाहन राज प्रोव्हिजन्स किराणा दुकानासमोर थांबवून काहीतरी सामान वाहनाच्या आतुन उतरवित असताना दिसून आले. यावरुन पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकली असता, एक अज्ञात इसम पोलिसांना पाहून हातातील चुंगळी वाहनाजवळ सोडून पळून गेला. मात्र वाहन चालक नामे ललीत गोपालदास राठी (41 वर्ष) हा पंच व पोलिसांना सदर चारचाकी वाहनाच्या ड्रायव्हर सिटवर बसलेला मिळून आला.

पोलीसांनी वाहन चालक व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मधल्या व मागील सिटवर पांढ­ऱ्या व पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये हिरव्या रंगाचा ‘होला हुक्का शिशा तंबाखू’ आणि लाल रंगाचा ईगल हुक्का तंबाखू असे लिहिलेले पॅकेट मिळून आले. वाहनातून होला हुक्का शिशा तंबाखू असे लिहीलेले 1000 ग्रॅम वजनाचे एकूण 130 पॅकेट (किंमत अंदाजे 1,72,250 रुपये), 2) लाल रंगाचे ईगल हुक्का तंबाखू असे लिहिलेले 400 ग्रॅम वजनाचे एकूण 154 पॅकेट (किंमत अंदाजे 1,30,900 रुपये), 3) एक जुनी वापरते ग्रे रंगाचे चारचाकी वाहन (एम एच 35, ए डब्लू 3395) (किंमत अंदाजे 3,00,000 रुपये) तसेच 4) आरोपी ललीत गोपालदास राठी याच्या ताब्यात असलेली एकूण 2,19,600 रुपये रोख रक्कम असा एकूण 8,22,750 रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे.

आरोपी ललीत राठी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थळावरून पळून जाणारा आरोपी हा राज प्रोव्हिजन्स किराणा दुकानाचा मालक इंद्रकुमार नागदेवे, रा.वडसा, ता.कुरखेडा, असल्याचे त्याने सांगितले. हा अवैध मुद्देमाल हा रवी मोहनलाल खटवानी, रा.गोंदिया याच्या मालकीचा असून त्याने विक्री करण्यासाठी सदर मुद्देमाल आपल्याकडे सोपविल्याचे आरोपी ललीत राठी याने सांगितले.

यावरुन या घटनेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी ललीत गोपालदास राठी, रवी मोहनलाल खटवानी (दोघेही रा.जिल्हा गोंदिया), आणि इंद्रकुमार नागदेवे, रा.वडसा यांच्याविरुध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि.प्रेमकुमार दांडेकर हे करीत आहेत.