‘सुधरेगा नही साला…’, निर्मल पुन्हा दारू तस्करीत

राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर?

कोरची : अनेक वर्षांपासून दारू तस्करीच्या कामात असलेला, पण अलिकडच्या दोन वर्षात या व्यवसायातून दूर झाल्याचे भासवत वाल्याचा वाल्मिकी होत असल्याचे सांगणारा कु्ख्यात निर्मल पुन्हा दारू तस्करीच्या व्यवसायात उतरला आहे. कोरची पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जांभळी रस्त्यावर सापळा रचून 40 पेट्या विदेशी दारू आणि वाहनासह एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल निर्मलचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ज्या वाहनातून ही दारू तस्करी सुरू होती त्या वाहनावर एका राजकीय पक्षाचे चिन्ह होते. त्यामुळे त्याचा फायदा घेत अनेक दिवसांपासून तर ही तस्करी सुरू नव्हती ना? अशी चर्चा सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरची पोलिसांना निर्मल धमगाये आणि त्याचा मुलगा तरुण हे गोंदिया जिल्ह्यातून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एपीआय मुकूंद देशमुख यांच्या पथकाने सापळा लावून देवरीकडून कुरखेडाकडे येणाऱ्या संशयित कारला अडविले. कारवरील राजकीय चिन्ह पाहून ती एखाद्या राजकीय नेत्याची असल्याचे दिसत होते. पण तपासणी केली असता त्यात विदेशी दारूच्या 40 पेट्या आढळल्या.

कारमधील लखन जोहरी बेसा (रा.बेडगाव) आणि धम्म गुणवंता बोरकर (रा.गिधाडी, जि.गोंदिया) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी हा माल निर्मल आणि त्याच्या मुलाचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे.