आरमोरी : तालुक्यातील मौजा पाथरगोटा ग्रामपंचायतमधील सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. मात्र पाथरगोटा ग्रामपंचायतीमध्ये एकही अनुसूचित जमातीचे मूळ कुटुंब नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करण्याची आणि पाथरगोटा गावाला पेसा कायद्यातून वगळण्याची मागणी करणारे निवेदन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अपर जिल्हाधिकारी गावंडे यांना देण्यात आले.

पाथरगोटा गावाची लोकसंख्या 1435 आहे. पण त्यापैकी एकही अनुसूचित जमातीचे मूळ कुटुंब नाही. म्हणून पाथरगोटा ग्रामपंचायतचे सरपंचपदाची अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातून काढण्यात आलेली सोडत रद्द करावी, तसेच गावाला पेसाअंतर्गत लाभ देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी कैलास दोनाडकर, अशोक दोनाडकर व इतर गावकरी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, याच पार्श्वभूमीवर आगामी ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी होणाऱ्या आरक्षणातील अन्यायकारक बाबींवरही माजी आमदार गजबे यांनी लक्ष वेधले. पाथरगोटा ग्रामपंचायतीमध्ये जातनिहाय लोकसंख्येनुसार, आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वास्तवता यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, आदिवासी विकासमंत्री तसेच विभागीय आयुक्त, नागपूर यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.












