गंभीर अवस्थेतील गर्भवतीचा आरोग्य पथकाने वाचविला जीव

कर्मचाऱ्यांची अशीही तत्परता

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत गोटेटोला उपकेंद्र जारावंडी येथील एका 19 वर्षीय गर्भवती महिलेला उच्च रक्तदाब आणि व झटके आल्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत आरोग्य पथकाने तातडीने कार्यवाही करत त्या महिलेचा जीव वाचवला आहे. रुनिता राहुल दुम्मा (रा.गोटेटोला) असे त्या महिलेचे नाव आहे.

ही महिला उच्च रक्तदाबाने त्रस्त होती. तिच्यावर 26 सप्टेंबरपासून आवश्यक औषधोपचार सुरू होते आणि उपकेंद्र जाराचंडी येथील कर्मचाऱ्यांचे नियमित गृह-निरीक्षण सुरू होते. अशातच दि.14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता त्या गर्भवती महिलेला अचानक झटके येऊ लागले. याची आशा स्वयंसेविकेने आरोग्य पथकाला कळवली. ही स्थिती ‘एक्लॅम्पसिया’ सारख्या गुंतागुंतीकडे घेऊन जाऊ शकते, हे लक्षात येताच केंद्रातील वैद्यकीय पथक तातडीने रुग्णवाहिकेसह तिच्या घरी पोहोचले.

गोटेटोला या अतिदुर्गम वस्तीपर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. यामुळे कोणताही विलंब न करता सामुदायिक आरोग्य अधिकारी गजानन शिंदे, आरोग्य कर्मचारी मडावी, सुनंदा आतला, रामटेके आणि रुग्णवाहक राजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्रा.आ.के.जारावंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशिल घोनमोडे यांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या महिलेवर प्रथमोपचार केल्याने प्रकृती स्थिर झाली, त्यानंतर तिला पुढील विशेष उपचाराकरिता महिला रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने आणण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, डोंगराळ व जंगलव्याप्त अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवताना अनेक अडचणी येतात, मात्र अशा परिस्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, समर्पण आणि माणुसकी यामुळे एका गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व गर्भवती महिलांनी नियमित आरोग्य तपासणी व उपचार करणे आणि आरोग्य कर्मचान्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घेणे अत्यंत आवश्यक, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे म्हणाले.