चामोर्शी येथे तेली समाजाचा वधूवर परिचय, नोंदणी मेळावा

मेळावे ही काळाची गरज- पिपरे

चामोर्शी : ​श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येथील संताजी भवनात तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळाव्याचे आयोजन केले होते. ‘दसरा आणि दिवाळीनिमित्त एक पाऊल समाजासाठी’ या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातून उपवधू आणि उपवर पक्षांनी मोठा प्रतिसाद दिला.

या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील तरुणांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध झाले. ​या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, प्रमुख उपस्थिती नागपूर विभागीय प्रांतिक तेली महासंघाचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी न.प. सभापती प्रमोद पिपरे आदी मान्यवर होते. दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

​यावेळी बोलताना योगिता पिपरे यांनी, योग्य जोडीदार निवडण्यात पालक आणि वधू -वरांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य असून, अशा मेळाव्यांमुळे हे कार्य अधिक सोपे होते, असे मत व्यक्त केले. तेली समाजाचे असे मेळावे होणे आजच्या काळाची गरज आहे आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटित राहण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

या आयोजनासाठी व्यंकटेश सोमनकर, तुळशीदास कुनघाडकर, मधुकर भांडेकर आणि जितेश वैरागडे यांनीही सहकार्य केले.