देसाईगंज येथे पदवीधर मतदार नोंदणीसाठी भाजपची बैठक

कागदपत्रे व नोंदणीबाबत मार्गदर्शन

देसाईगंज : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी दक्षिण नागपूरचे माजी आमदार तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना सुधाकर कोहळे म्हणाले, “पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागातील सर्व नागरिक, ज्यांनी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी पदवी किंवा समकक्ष पदविका प्राप्त केली आहे, त्यांनी आपली नाव नोंदणी अवश्य करावी. आपल्या हक्काच्या नोंदणीसाठी ‘अर्ज क्र. 18’ या नमुन्यात तसेच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा आणि पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घ्यावा. मतदार नोंदणी ही पुन्हा एक उत्सव आहे; यात सर्वांनी सहभाग घ्यावा व लोकशाही बळकट करावी, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. ऑनलाईन नोंदणी सुलभ व पारदर्शक असून, http://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधेसह प्रक्रिया पूर्ण करता येते. युवकांनी, नवपदवीधरांनी व वरिष्ठांनी एकत्र येऊन आपल्या मतदारसंघासाठी हा अधिकार सदृढ करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार कृष्णा म्हणाले, “आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार नोंदणीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार होणे, हे लोकशाहीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या मोहिमेअंतर्गत पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत जबाबदारीने जनजागृती करावी. पक्षाचे सर्व स्तरांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते या नोंदणीसाठी पुढाकार घेतील आणि मतदारसंघात 100 टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करतील,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा पदवीधर नोंदणी प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, देसाईगंज शहर नोंदणी प्रमुख मोतीलाल कुकरेजा, ग्रामीण नोंदणी प्रमुख महेश झरकर, आरमोरीचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडाचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कोरची तालुका अध्यक्ष सदाराम नरोठी, देसाईगंजचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.