गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीच्या गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C वर वाढलेले सततचे अपघात व त्यातील जीवित हानीमुळे या महामार्गाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

वारंवार अपघात होऊन जीवितहानी होत असल्याच्या या स्थितीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जबाबदार धरून शिस्तभंगविषयक आणि कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत त्यासाठी खुलासा सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या महामार्गावर सुरक्षा उपाययोजना तात्काळ करण्याची ताकीद या नोटीसद्वारे देण्यात आली.
दि.14 ऑक्टोबर रोजी या महामार्गावर प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला होता. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अहवालावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या अहवालानुसार, सध्या रस्त्यावर पावसाळ्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनधारक धोकादायकरीत्या रस्त्याची लेन बदलतात, ज्यामुळे समोरासमोर अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच, केवळ सात मीटर रुंदीच्या या रस्त्यावर दोन अवजड वाहने जातील अशा प्रकारे डिझाईन असल्याने, भविष्यातील वाहतुकीचा विचार करून रस्त्याचे रुंदीकरण करणे आणि मध्यभागी मिडीयन तयार करणे आवश्यक आहे. याशिवाय, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या 1.4 मीटरच्या रोड शोल्डरला मुख्य रस्त्याच्या पातळीवर आणून भरणा करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी याच रोड शोल्डरवर वाढलेल्या झाडे-झुडूपांमुळे वाहनचालकांना रस्त्याचा नेमका अंदाज व दृश्यमानता येत नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
सुरक्षा फलक आणि वेग नियंत्रणाचे निर्देश
सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेले वेगमर्यादा फलक तातडीने प्रदर्शित करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, शाळा आणि रुग्णालये यासारख्या संवेदनशील ठिकाणी आयआरसीच्या सूचनेनुसार आवश्यक सुरक्षा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. मिडीयन किंवा जास्त वर्दळीच्या ठिकाणी ब्लिंकर्स आणि उतारावर वेग नियंत्रणासाठी रम्बलर स्ट्रिप बसवण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या नोटीसद्वारे दिले आहेत.
















