जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर भाजपनेही केली स्वतंत्र लढण्याची तयारी

सर्व्हेक्षण करून उमेदवारी देणार

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्षांसोबत मिळून निवडणूक लढायची किंवा नाही याचे स्वातंत्र्य वरिष्ठांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे महायुतीमधील मोठा पक्ष म्हणून आम्ही त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एपी) आणि शिवसेनेपुढे (शिंदे) युतीचा प्रस्ताव ठेवणार आहे. पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भाजपची तयारी आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) तथा माजी खा.अशोक नेते, आमदार डॅा.मिलींद नरोटे, माजी आमदार डॅा.देवराव होळी, डॅा.नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र ओल्लालवार, अनिल पोहणकर, अनिल तिडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना प्रा.बारसागडे म्हणाले, भाजपमध्ये कोणत्याही ईच्छुकाला थेट उमेदवारी दिली जाणार नाही. कोणी आपली उमेदवारी पक्की आहे असे समजत असेल तर तेही खोटे आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ईच्छुक उमेदवारांनी येत्या 25 आॅक्टोबरपर्यंत संबंधित शहर अध्यक्ष, मंडळ अध्यक्षांकडे आणि जिल्हा परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांच्याकडे अर्ज करायचा आहे. त्या अर्जांची छाननी करून लोकांची पसंती, निवडून येण्याची क्षमता या मुद्द्यांचे सर्व्हेक्षण केले जाईल. त्यानंतर लोकांच्या मनातील उमेदवार निश्चित केला जाईल, असे प्रा.बारसागडे म्हणाले.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एपी) नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भाजपनेही तशी तयारी केल्याने यावेळी लढती चुरसपूर्ण होण्याची शक्यता आहे.

भाजप म्हणते, आम्ही युतीधर्म पाळला

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही युतीधर्म पाळत त्यांच्यासाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या विजयात भाजपचे योगदान निश्चितपणे आहे. पण धर्मरावबाबांनी चामोर्शीतील मेळाव्यात भाजपवर आगपाखड करत त्यांच्याविरूद्ध भाजपने काम केल्याचा आरोप खोटा असल्याचे यावेळी प्रा.रमेश बारसागडे यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या ओघात धर्मरावबाबांनी भाजपला तुकडाही मिळू देणार नाही, असे जे वक्तव्य केले त्यावरही प्रा.बारसागडे यांनी आक्षेप घेतला. त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. वास्तविक 2017 च्या निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता बसवली. सर्व नगर परिषदांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली. असे असताना त्यांनी तुकड्याची भाषा कशी करू, असे प्रा.बारसागडे म्हणाले. युतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही दोन्ही पक्षांकडे प्रस्ताव ठेवू, चर्चेतून काही मार्ग निघाला तर ठीक, अन्यथा आम्ही सर्व जागा लढणार आहोत, असे प्रा.बारसागडे म्हणाले.