गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विकास मंडळाच्या वतीने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत कारागिरांची कार्यशाळा आणि जनजागृती मेळावा घेण्यात आला.

या योजनेचा फायदा सुतार, लोहार, सोनार, शिंपी कारागीर, शेतकरी कामगार वर्गाला होणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार कारागिरांना 15 हजारांची टूल किट मोफत मिळणार आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कारागिरांना एक लाखापर्यंतचे कर्ज फक्त 5 ते 6 टक्के व्याज दराने 18 महिन्यांसाठी मिळणार आहे. सर्व वर्गातील कारागिरांनी, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनांचा फायदा घ्यावा, असे मार्गदर्शन यावेळी विश्वकर्मा योजना सुकानू समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

विश्वकर्मा योजनेच्या लाभार्त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, लेखा तसेच बाजारपेठेबद्दलचे मार्गदर्शन बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, एमएसई नागपूरचे सहायक संचालक विद्याधर खरे यांनी केले. यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भास्कर मेश्राम, बँक ऑफ इंडिया व मंडळाचे कर्मचारी काकपुरे तसेच जिल्ह्यातील कारागीर वर्ग उपस्थित होते.












