गडचिरोली : नागपूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कंडादेव येथील अनिल दुलसा वड्डे याने 19 वर्षे वयोगटात लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विभागीय क्रीडा स्पर्धेतील लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल अनिल याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभू सादमवार, मार्कंडादेव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद वरगंटीवार, क्रीडा मार्गदर्शक कृपांती बोरसरे आणि शिक्षकांनी कौतुक करत त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तीन दिवस चाललेल्या या विभागीय क्रीडा स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, रिले स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कडादेव येथील अनिल वड्डे, स्वरा पदा, मयुरी पोटावी, वर्षा लेकामी, पुजा मट्टामी, अक्षरा होडी, रीना लेकामी, खुशी गोटा, दिव्या दुर्वा, राकेश मट्टामी, सुरेश कुजूर, राहुल तिम्मा या 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

































