‘स्वच्छता शिल्पकारां’सोबत आ.डॉ.नरोटे यांचा स्नेहसंवाद

समस्या जाणून घेत केला सन्मान

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद गडचिरोली येथील सफाई कामगारांसोबत ‘स्नेह मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्तव्य कक्ष क्रमांक 1 येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ.नरोटे यांनी सर्व सफाई कामगारांशी आस्थेने संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या.

शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे अमुल्य योगदान अधोरेखित करत, डॉ.नरोटे यांनी त्यांना ‘शहराचे स्वच्छता शिल्पकार’ म्हणून गौरवले. त्यांच्या परिश्रमामुळेच गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर राहते, असे त्यांनी नमूद केले.

या स्नेहमिलन कार्यक्रमात, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या योगदानासाठी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.नरोटे म्हणाले, “सफाई कामगार हे आपल्या शहराचा पाया आहेत. त्यांच्या कामामुळेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते. त्यांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना चांगले जीवनमान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.