राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनकल्याण यात्रेचा रविवारी दुसरा टप्पा

सिने अभिनेत्री माधुरी पवार येणार

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण तापवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने आयोजित जनकल्याण यात्रेचा दुसरा टप्पा येत्या रविवारी उत्तर गडचिरोली भागातील देसाईगंज येथून (दि.26) सुरू होणार आहे. यावेळी पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सिने अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.

दोन आठवड्यापूर्वी या जनकल्याण यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी चामोर्शी येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी भाजपवर टिका करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या देसाईगंज (वडसा) येथील जाहीर सभेत धर्मरावबाबा काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.