देसाईगंज : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेसची रणनिती सुरू असताना दुसरीकडे काही पदाधिकारी अंतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी करत असल्याची कुजबूज सुरू आहे. त्यात सिंधी साहित्य अकादमीचे माजी राज्यस्तरीय अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्यासह इतर काही लोकांची नावे चर्चेत आहेत.

धर्मरावबाबा आत्राम यांच्या रविवारच्या जाहीर सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता काही पदाधिकाऱ्यांनी धर्मरावबाबांची भेटही घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसाईगंजमध्ये काँग्रेससाठी हा धक्का असेल.
दुसरीकडे गडचिरोली शहरातही काँग्रेसशी जवळील असलेला एक गट काँग्रेसला साथ देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेसोबत (शिंदे गट) हातमिळवणी करून निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उतरणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अशा स्थितीत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळातील मंडळींचे लक्ष लागले आहे.
































