
गडचिरोली : नवी दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात ‘जनजाति गौरव दिवस’ आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रविवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध राज्यातून आदिवासी समाजाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी इतर अतिथींसह गडचिरोलीचे माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनाही विशेष अतिथी म्हणून दीप प्रज्वलनाचा बहुमान मिळाला.

यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून बिरसा मुंडा यांच्या अदम्य संघर्षाची, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची आणि आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी जीवनमूल्यांची आठवण करून देण्यात आली. या कार्यशाळेतून समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या आदर्श मार्गावर चालत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे संकल्प व्यक्त केले.
कार्यशाळेला भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोषजी, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही.सतीश, भाजपा जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर उराव, राष्ट्रीय महामंत्री राधामोहन दास, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राष्ट्रीय महामंत्री कालीराम माजी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यशाळेतून आदिवासी समाजाचा आत्मसन्मान या विषयावर सखोल चर्चा झाली. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेतून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
































