विद्यार्थ्यांना दिली सायबर गुन्ह्यांसह ऑनलाईन फसवणुकीची माहिती

पोलीस विभागातर्फे आयोजन

गडचिरोली : दिवसेंदिवस सायबर गुन्हे, तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंडियन सायबर क्राइम को-आॅर्डिनेशन सेंटरच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून देशभरात साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत येथील कारमेल हायस्कूलमध्ये ‘सायबर जनजागृती कार्यशाळे’चे आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते.

सदर सायबर कार्यशाळेदरम्यान 8 ते 10 व्या वर्गाच्या 250 विद्यार्थांना सायबर गुन्ह्रांचे प्रकार, विविध ऑनलाईन फ्रॉड, सायबर सुरक्षिततेसाठी उपाय, तसेच सोशल मीडियाचा वापर, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विविध व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थांना ओटीपी शेयर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, तसेच सायबर गुन्हा झाल्यास 1930 किंवा 1945 या क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार करण्याविषयी माहिती देण्यात आली.

या जनजागृती कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, ‘आजच्या डिजीटल युगामध्ये मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. मात्र या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक, माहिती चोरी, हॅकिंग यासारख्या घटनांविषयी आपण सतर्क राहिले पाहिजे, यापासून सुरक्षित राहण्यासाठी 1930 व 1945 हे गोल्डन नंबर आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभरातून एक तासापेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर न करता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.’

सदर कार्यशाळेप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप, गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद चव्हाण, स्थागुशा गडचिरोलीचे पोनि अरुण फेगडे, कारमेल हायस्कुलचे मुख्याध्यापक फादर मेलजो चेरीयन, उपमुख्याध्यापक फादर जॉर्ज वर्गीस हे उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी उपनिरीक्षक सरीता मरकाम, सायबर पोलीस स्टेशनच्या उपनिरिक्षक नेहा हांडे तसेच अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.