आज महिला-बाल रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री अहेरीत

सिरोंचात खासगी मेडिकल कॅालेज

गडचिरोली : दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या अहेरी येथील बहुप्रतीक्षित महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्र्यांचे अहेरीत आगमन होईल. तत्पूर्वी सिरोंचा येथे खासगी मेडिकल कॅालेजच्या पायाभरणी समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील.

आतापर्यंत गरोदर महिला किंवा बालकांची प्रकृती गंभीर झाल्यास उपचारासाठी गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवले जात होते. पण या रुग्णालयामुळे अहेरीतच योग्य उपचार होऊ शकेल. या तीन मजली इमारतीत उपचाराच्या सर्व आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान नक्षलप्रभावित भागात मुख्यमंत्री येणार असल्याने पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी यांनी शुक्रवारी अहेरीत येऊन महिला व बाल रुग्णालयाच्या परिसराची पाहणी केली. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यासुद्धा दोन दिवसांपासून तयारीत सक्रिय आहेत.