
गडचिरोली : गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांतच्या वतीने मंगळवारी (दि.11) विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विद्यापीठासमोर निदर्शने केली. कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे यांनी विद्यापीठाच्या गेटबाहेर येऊन मोर्चेकरी विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. सर्व मागण्या सकारात्मकरित्या पूर्ण करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिले.

या मोर्चादरम्यान प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम तसेच छात्रसंघ निवडणुका या विषयांवर विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रांत मंत्री पायल किनाके यांनी केले. हा मोर्चा विद्यापीठाच्या समोर आल्यानंतर तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मंचावर प्रांत सहमंत्री जयेश भडगरे, विद्यापीठ मोर्चा प्रमुख सुजान चौधरी, चंद्रपूर जिल्हा संयोजक भूषण डफ, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक राजकुमार गेडाम, गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलवार व गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
परीक्षा एजन्सी बदलल्यामुळे गडबड
मोर्चेकरांच्या मागण्यांमध्ये असलेल्या परीक्षेसंदर्भातील गोंधळाबाबत कुलगुरूंना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार अलिकडेच परीक्षा संचालनाची प्रक्रिया ‘एमकेसीएल’ कडून ‘ई-समर्थ’ या एजन्सीकडे दिली आहे. त्यामुळे कुठलीही नवीन ईआरपी आल्यानंतर सुरूवातीला 3-4 परीक्षेपर्यंत त्रास होतो. त्यात लवकरच सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय ज्या शासनस्तरावरील मागण्या आहेत, त्या आमच्या शिफारसीसह शासनाकडे पाठवू, असे आश्वासन कुलगुरू डॅा.बोकारे यांनी दिले.
































