गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतजमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करून त्या ठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचा स्टील प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सुपीक व बारमाही शेतीयोग्य जमिनी उद्योगासाठी वापरणे हे अन्यायकारक असल्याचे सांगत भेंडाळा, फोकुर्डी, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगणापूर, कान्होली, कळमगाव, नवेगाव माल, चाकलपेठ आदी गावांच्या ग्रामसभांनी जमीन अधिग्रहणास विरोध दर्शवत तसे ठराव मंजूर घेतले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

चिचडोह व कन्नमवार जलाशयामुळे भेंडाळा परिसरातील शेतजमिनी ओलीताखाली आल्याने या भागातील शेती बारमाही झाली आहे. शेतीची उत्पादनक्षमताही वाढली आहे. अशा जमिनी उद्योगासाठी घेणे म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करणे आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर त्याचा थेट परिणाम होईल, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.
या संदर्भात भेंडाळा परिसरातील सरपंच, पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. एमआयडीसीसाठी जमीन देण्यास आम्ही तयार नाही, असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी यावेळी सांगितला.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत, काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत हा प्रश्न शासनदरबारी जोरदारपणे मांडला जाईल, असे आश्वासन संबंधितांना दिले.
यावेळी वेलतूर तुकूमचे उपसरपंच दिगंबर धानोरकर, घारगावचे सरपंच विवेक भगत, मोहर्लीचे सरपंच सुधीर शिवणकर, गंगाधर शेडमाके, भरत घेर, चरण पोर्टे, मनोज पोरटे, राजेश्वर चौधरी, तोताजी आभारे, सतीश पुटकमवार, नुमचंद भिवणकर, रोहिदास धोटे, रेवनाथ खेडेकर, संजय खेडेकर, रवींद्र वाडगुरे, नरेंद्र जिवारे, मनोज बारसागडे, आनंदराव सातपुते, नामदेव दिगंबर, गुरुदेव घोगरे, तुमदेव देहलकर यांच्यासह भेंडाळा परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, तसेच शेतकरी उपस्थित होते.
































