गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरण्याचे पहिले दोन दिवस निरंक गेल्यानंतर बुधवारी तिसऱ्या दिवशी दोन अर्ज आले. त्यात गडचिरोलीत सदस्यपदासाठी एक, तर आरमोरीत नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज आला. देसाईगंजमध्ये मात्र अजूनही शुकशुकाट आहे. त्यामुळे यावेळी अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी कमी राहण्याची शक्यता असून सर्व ईच्छुक राजकीय पक्षांची उमेदवारी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करून असल्याचे दिसून येत आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

आरमोरीत नगराध्यक्षपदासाठी वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नामांकन दाखल केले. नगरसेवक पदासाठी अद्याप आरमोरीत एकही नामांकन आलेले नाही. गडचिरोलीत नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 13 अ मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे यांनी नामांकन दाखल केले. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रभागातून आणि नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकही नामांकन आलेले नाही.
व्यापारनगरी देसाईगंजमध्ये अद्याप शुकशुकाट आहे. नगराध्यक्षपद किंवा नगरसेवकपदाची निवडणूक लढू ईच्छिणाऱ्या कोणीही नामांकन दाखल केलेले नाही. त्यामुळे सर्वजण सध्या पडद्यामागील हालचालींमध्येच व्यस्त असल्याचे दिसून येते. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे. मध्ये शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी गुरूवार, शुक्रवार आणि शेवटचा दिवस सोमवार असे तीनच दिवस शिल्लक आहेत.
गडचिरोलीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस लागली आहे. काँग्रेसची उमेदवारी जवळजवळ निश्चित असली तरी भाजपमध्ये नवे-जुने असा वाद कायम आहे. माजी नगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख योगिता पिपरे, पक्षाच्या जिल्हा महामंत्री आणि आधार विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात असलेल्या गीता हिंगे, तसेच नव्याने पक्षात दाखल झालेले दोन ईच्छुक दावेदार यांच्यापैकी कोणाला तिकिटाची लॅाटरी लागते हे दोन ते तीन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
































