राष्ट्रवादी-शिवसेनेचे सूर जुळले, गडचिरोलीत एकत्र लढणार

प्रा.राजेश कात्रटवार राष्ट्रवादीत

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपसोबत युतीचे सूर बिघडले असले तरी शिवसेनेसोबत (शिंदे गट) सूर जुळले आहेत. गडचिरोली शहरात त्यांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देसाईगंज आणि आरमोरी नगर परिषदेतही एकत्र लढण्यासाठी बैठका सुरू आहेत. दरम्यान काँग्रेसशी जवळीक असलेले प्रा.राजेश कात्रटवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला बळ दिले आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, नाना नाकाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष डॅा.स्नेहल कोवे, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, सुनील डोगरा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कात्रटवार यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीला बळ मिळाले आहे. आमची सत्ता नगर परिषदेवर आल्यानंतर कोणत्याही विकास कामांसाठी निधी पडू देणार नाही, असा मनोदय आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.