दुखावलेले निष्ठावंत शिवसैनिक कात्रटवारांचा ‘जय महाराष्ट्र’

संपर्क प्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून गडचिरोली जिल्ह्यात पक्षाचा झेंडा फडकवत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी दु:खदपणे हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात आधीच मोजक्या प्रमाणात शिल्लक असलेल्या निष्ठावान शिवसैनिकांचे मनोबल आणखी खचण्याची शक्यता आहे.

कात्रटवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा धुळीस मिळत असून केदारी यांच्या कार्यप्रवृतीमुळे आपण पक्षाला कायमचा
‘जय महाराष्ट्र’ करीत असल्याचे नमुद केले आहे.

‘माँसाहेब मिनाताई ठाकरे आणि पूज्यनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून पक्षासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करीत आहे. मागील 35 वर्षांपासून जनतेच्या हितासाठी हजारो आंदोलने, मोर्चे काढून न्याय मिळवून दिला. पक्षात दुफळी माजल्यानंतर पक्षाच्या संकटाच्या काळात सुध्दा आपली साथ सोडली नाही. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ‘ब्रिद’ जोपासून गडचिरोली जिल्हयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष जीवंत ठेवला. मात्र, महेश केदारी यांच्याकडे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून केदारी यांनी पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना सापत्निक वागणूक देऊन माझ्यासारख्या निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या शिवसैनिकाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. केदारी हे पक्षासाठी कोणतेही काम न करणाऱ्या आणि जनतेमध्ये कोणतेही अस्तित्व नसलेल्या आणि लांगुलचालन करणाऱ्यांना जवळ करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असा आरोप अरविंद कात्रटवार यांनी आपल्या राजीनामापत्रात केला आहे.

विशेष म्हणजे अरविंद कात्रटवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी अनेक वर्षापासून तयारी करत आहेत. मात्र आधी त्यांच्याकडील सहसंपर्क प्रमुखपद काढून घेतल्यानंतर आता कात्रटवार यांना जि.प.साठी पक्षाचा बी-फॅार्मही दिला जाणार नसल्याची चुणूक कात्रटवार यांना लागली होती. यामुळे पक्षात होत असलेली ही घुसमट दूर करत अखेर त्यांनी राजीनामास्र सोडून या घुसमटीतून स्वत:ची सुटका केली. त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिकांनीही पक्षत्याग केला आहे.