
अहेरी : नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा दुरावा वाढल्यानंतर पक्षाचे नेते आ.धर्मरावबाबा यांच्याकडून एकेक मोहरे टिपत त्यांना आपल्या बाजुने वळवणे सुरू आहे. यात शुक्रवारी मूळचे राष्ट्रवादीचेच असलेले पण काही वर्षापासून भाजपसोबत असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले. एवढेच नाही तर अहेरीचे माजी आमदार आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते दीपक आत्राम यांच्यासोबत हातमिळवणी करत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सोबत लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे अहेरी विभागातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी (दि.14) माजी आ.दीपक आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दीपकदादांनी शाल पांघरून धर्मरावबाबांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबांचा पराभव केल्यानंतर आविसं नेते दीपक आत्राम हे प्रकाशझोतात आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला, पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तेव्हापासून ते फारसे सक्रिय नाहीत. पण धर्मरावबाबांनी घेतलेल्या भेटीमुळे दीपक आत्राम यांचे राष्ट्रवादीत राजकीय पुनर्वसन होणार, की आदिवासी विद्यार्थी संघाचे बॅनर कायम ठेवत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































