कुरखेडा तालुक्यात गांजाची शेती, 1 कोटी 19 लाखांचा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कुरखेडा : कुरखेडा पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्यालदंड या गावात पिकवल्या जात असलेल्या गांजाच्या शेतीचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या कारवाई तब्बल 1 कोटी 19 लाख 83 हजार रुपये किमतीचा 239.66 किलो गांजा (कॅनबिस) जप्त करण्यात आला. त्यात गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे आणि बिया संलग्न होत्या.

कृष्णा हरसिंग बोगा रा.हु्र्यालदंड असे गांजा पिकवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याने आपल्या घराच्या सांदवाडीत (घरालगतच्या मोकळ्या जागेत) अवैधरित्या गांजाची लागवड केली असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हु­र्यालदंड येथील कृष्णा हरसिंग बोगा (41 वर्षे) याच्या घरी पोहोचून कायदेशीर प्रक्रियेनुसार घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ गांजाची लागवड केलेली दिसून आली. त्यामुळे आरोपी कृष्णा बोगा याच्याविरूद्ध पोलीस स्टेशन पुराडा येथे गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन अंमली पदार्थ (वनस्पती) जप्त करण्यात आला. या गुन्ह्राचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि.आकाश नायकवाडी करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात, सपोनि समाधान दौंड, पोअं/रोहीत गोंगले, पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे, चापोअं/गणेश वाकडोतपवार, पोहवा/संतोष नादरगे, पोअं/नितेश सारवे यांनी पार पाडली.