दुचाकीवरून दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षता

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे. यादरम्यान रात्री दुचाकीवरून दारूच्या पेट्या घेऊन येत असलेल्या तीन युवकांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई पारडी नाक्यावर करण्यात आली.

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने नागरिकांना सर्वाधिक आकर्षण दारूचेच असते. त्याचाच फायदा घेत अनेक वेळा उमेदवार निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूच्या बाटल्यांचे वाटप करतात. याशिवाय किरकोळ दारूविक्रीलाही उधान येते. याचा फायदा घेत नफा कमवण्यासाठी काही युवक दुचाकीवरून दारूच्या पेट्या घेऊन येत असल्याचे एसएसटी टिमला दिसून आले.

पोलिसांनी त्यांना रोखून तपासले असता त्यांच्याकडे 27 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. त्या दारूसह त्यांचे दुचाकी वाहन जप्त करून तिघांना अटक करण्यात आली.