गडचिरोलीत नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, नामांकनच नाही

शेवटच्या दिवशीच पत्ते खोलणार

नगर परिषदेत नामांकन प्रक्रियेची पाहणी करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अद्याप प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणीही आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. विशेष म्हणजे नामांकन दाखल करण्यासाठी रविवार आणि सोमवार हे दोनच दिवस शिल्लक असताना नगराध्यक्षपदासाठी कोण-कोणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे गडचिरोलीत नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकही नामांकन आलेले नाही हे विशेष. न.प. सदस्य पदासाठीही गडचिरोलीत जेमतेम 10 लोकांनी नामांकन भरले आहेत.

देसाईगंजमध्ये नगराध्यक्षपदासाठी 1, तर सदस्यपदासाठी 11 नामांकन आले. याशिवाय आरमोरीत नगराध्यक्षपदासाठी 2, तर सदस्यपदासाठी 6 नामांकन आले आहेत. ही स्थिती पाहता यावेळी बहुतांश उमेदवारांची मदार पक्षीय उमेदवारीवरच असून अपक्षांची संख्या मोजकीच राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी शेवटच्या दिवशी नामांकन भरण्यासाठी होऊ घातलेली गर्दी पाहता जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गडचिरोली नगर परिषदेतील नामांकन प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी स्मीता बेलपत्रे, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.

आजही नामांकन स्वीकारले जाणार

नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा ऑनलाइनसोबतच ऑफलाइन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची महत्त्वाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, आज रविवारी (दि.16) या सुटीच्या दिवशीही सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांचा सहभाग अधिक सुलभ व्हावा आणि तांत्रिक अडचणी येणाऱ्या इच्छुकांना न्याय मिळावा, याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन प्रक्रियेसोबत पारंपरिक ऑफलाइन मार्गही खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.