41 आश्रमशाळांचे 1100 खेळाडू दाखविणार क्रीडा कौशल्य

आजपासून प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर बुधवार, दि.19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील 41 आश्रमशाळेतील सुमारे 1100 आदिवासी खेळाडू सहभागी होणार असून क्रीडा कौशल्य व नैपुण्यता दाखविणार आहेत.

या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक निलोत्पल राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे राहणार आहेत.

या क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील 24 शासकीय तर 17 अनुदानित अशा एकूण 41 आश्रमशाळेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. 14, 17 व 19 वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळांसह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळांचे आयोजन केलेले आहे.

क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभू सादमवार, लालू नरोटे, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, आशिष नंदनवार, मुकेश गेडाम, अनित टेंभुरकर, रवी आत्राम, विभा बागडे, संतोष कन्नाके आदींसह सुमारे 200 कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.