देसाईगंजच्या गांधी वॅार्डात तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधन

मा.आ.गजबे यांची विशेष उपस्थिती

देसाईगंज : येथील गांधी वार्डातील श्री हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला, सत्यपाल महाराज यांचे शिष्य आणि सप्तखंजिरीवादनात पारंगत, राष्ट्रीय प्रबोधनकार- कीर्तनकार तुषार सूर्यवंशी (नागपूर) यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि.19 च्या रात्री रंगलेल्या या कीर्तनात विनोदी शैलीतून, सांस्कृतिक वारसा सांगत प्रबोधन करण्यात आले.

यावेळी आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी तुषार सूर्यवंशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजहितासाठी युवकांवर संस्कार आणि प्रबोधन कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी सांगितले. “युवा पिढीला योग्य मार्ग मिळावा आणि समाजात सकारात्मक बदल घडावा, हीच अशा कीर्तनाची खरी देण आहे. हास्य आणि प्रबोधनात्मक वातावरणातून वेगळी ऊर्जा मिळते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची गरज आहे. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक वारसा जपणे आजच्या काळाची गरज आहे. तुषार सूर्यवंशी यांच्या विनोदी शैलीतून दिल्या जाणाऱ्या संदेशाचा समाजावर चांगला प्रभाव पडतो. युवा पिढीने संस्कार घेऊन समाजाच्या विकासात पुढाकार घ्यावा.” असे आवाहन यावेळी मा.आ.गजबे यांनी केले.

या कार्यक्रमाला गांधी वार्ड परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. प्रबोधनाच्या कलात्मक सादरीकरणाने सर्वांनाच नवा विचार दिला.