कोकडकसाच्या मांजरी वाद्याने जिंकले दीड लाखाचे बक्षीस !

कला संगम राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम कोकडकसा गावातील मांजरी वाद्य (पराई) पथकाने नागपूर येथे झालेल्या भगवान बिरसा मुंडा कला संगम राज्यस्तरीय फेरी स्पर्धेत प्रभावी सादरीकरण करत दीड लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकवले आहे. त्यांच्या या कामगिरीने अतिदुर्गम आदिवासी कोकडकसा गांव राज्याच्या नकाशावर आले आहे.

आदिवासी कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांची संस्कृती टिकून राहावी या हेतूने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर येथे राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यातील पथकांनी सहभाग नोंदवला होता.

शासकिय माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय कारवाफा येथे कार्यरत शिक्षिका चंदा कोरचा यांच्या मार्गदर्शनाखाली कोकडकसा येथील आदिवासींनी मांजरी वाद्य (पराई) सादर केले होते. त्यांच्या पारंपरिक पराई वाद्याच्या लयबद्ध सुरांनी आणि आदिवासी वेशभूषेत केलेल्या आकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत कोकडकसा पथकाने आपली छाप पाडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पथकाचे तोंडभरून कौतुक करून त्यांना सन्मानित केले.

मांजरी वाद्य पथकात मनीराम पदा, मनेश उसेंडी, किसन हिचामी, सचिन पदा, विवेक पदा, भाष्कर कड्यामी, महेश उसेंडी, श्रीधर उसेंडी, युगंधर पदा, आशिक पदा, बंडू पदा, रामचंद्र पदा, गणेश पदा, मोहन पदा, राजू पदा, संदीप दुगा, गुरुदेव पदा, प्रवीण नैताम आदिंचा सहभाग होता.