गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या औद्योगिकरणाला आवश्यक मनुष्यबळ देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. सदर संस्थेच्या बळकटीकरणासाठी भारतीय औद्योगिक महासंघाच्या 36 पदाधिकारी व सदस्यांनी गडचिरोलीत अभ्यास दौरा आयोजित केला होता. सदर शिष्टमंडळाने गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्र व सी.आय.आय.आय.टी. तसेच कोनसरी स्थित लॉयड्सच्या पोलाद प्रकल्पास भेट दिली.
शिष्टमंडळात भारतीय उद्योग परीसंघाचे नागपूर येथील अध्यक्ष जामदार, उपाध्यक्ष अमिताभ सिन्हा, फार्मर डायरेक्टर व्ही.एन.आय.टी. नागपूरचे पी.एम. पडोळे, टी.सी.एस.नागपूरचे सेंटर हेड अरविंद कुमार, एच.सी.एल.टेक.नागपूरचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट शैलेश आवळे व इतर उद्योग घराण्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
दरम्यान विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या नियामक मंडळ सभागृहात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी त्यांच्या संबोधनात विदर्भ प्रांतात उद्योग व विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थांसोबत विविधांगी क्षेत्रात सहचर्य निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. उद्योगांच्या गरजेनुसार सल्लागार प्रकल्प, संसाधन उपयुक्तता, प्रशिक्षण, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता शिकाऊ उमेदवारी, रोजगार निर्मिती इत्यादींचा समावेश होता. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे प्रभारी संचालक प्रा.मनीष उत्तरवार हेसुद्धा उपस्थित होते.
































