गडचिरोली : आपल्या शेतातील कापणी केलेल्या धान मळणीच्या प्रतीक्षेत शेतात पुंजणे उभारून ठेवलेला असताना रात्री आलेल्या हत्तींनी त्यावर ताव मारला. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया गेल्याचे दु:ख सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. खुशाल बैजू पदा (55 वर्ष) रा.देलोडा (बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पदा यांनी आपल्या अडीच एकर शेतात खरीप हंगामात धानाची लागवड केली होती. त्यातून निघालेल्या पिकाची कापणी करून धानाचे पुंजणे लावून ठेवले होते. पण हत्तींनी एका रात्रीत त्यातील बरेच धान फस्त केले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत आलेल्या तणावातून पदा यांनी विष प्राशन केल्याचा दावा कुटुंबियांनी केला. विशेष म्हणजे गेल्या तीन हंगामापासून दरवर्षी पदा यांच्या पिकांची हत्तींकडून नासधूस केली जात आहे. पोर्ला वनपरिक्षेत्रात येणाऱ्या या गावात हत्तींचा धुमाकूळ होत असताना वनविभाग मात्र हतबल होऊन शेतकऱ्यांना तोकडी नुकसानभरपाई देते, असे गावकऱ्यांचे म्हणने आहे.
खुशाल पदा यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.
































