गडचिरोली : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर करून त्याचे वितरण केले, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे सात हजारांहून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना आजतागायत त्यांच्या हक्काचा बोनस प्राप्त झालेला नाही. त्याबद्दल खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून वनपट्टेधारक शेतकऱ्यांचा बोनस तातडीने देण्याची मागणी केली.
गडचिरोली या मागास जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वनक्षेत्रातील जमिनीवर शेती करून उपजीविका चालवितात. संबंधित शेतकऱ्यांना शासनाने वनपट्टे दिले असून ते नियमित महसूल नोंदीत सातबारा धारकांप्रमाणेच शेती करीत आहेत. तथापि, बोनस वितरणाच्या प्रक्रियेत फक्त सातबाराधारक शेतकऱ्यांचाच लाभ होत आहे. वनपट्टेधारक शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे, असे खा.किरसान यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना येथे राहणाऱ्या गोरगरीब, अल्पभूधारक व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या बोनससाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे, ही दुःखद व शेतकरीविरोधी परिस्थिती असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बाबीकडे लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर सर्व वनपट्टेधारक शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली बोनसची रक्कम तात्काळ अदा करावी, अशी मागणी खा.डॉ.नामदेव किरसान यांनी केली आहे.
































