प्रभाग 1 आणि 8 मधील भाजपच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन

मा.खा.डॅा.अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रभाग क्रमांक 1 आणि 8 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना विजयाकडे नेण्यासाठी ‘एकदिलाने’ काम करा, असा संदेश देण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्यास आणि प्रचारार्थ प्रामुख्याने आमदार तथा गडचिरोली निवडणूक प्रभारी आ.बंटी भांगडिया, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, डॉ.भारत खटी, भाजपा नेते संजय गजपुरे, जेष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, माजी सभापती रंजिता कोडापे, चंद्रशेखर भडांगे, सोमेश्वर धकाते, पल्लवी बारापात्रे, जनार्दन साखरे, तसेच भाजपचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. केंद्र व राज्यात भाजपा सत्तेत असल्याने नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आली तर अनेक मोठी कामे वेगाने पूर्ण होतील. विकासाचा मार्ग गतीमान होईल. गडचिरोली शहरच नाही तर हा जिल्हा विकासात अग्रेसर ठरणार”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“लक्ष्मी ही कमळावर बसते. त्यामुळे नगरपरिषदेत कमळ फुलवा. सर्वांगीण विकास हवा असेल तर प्रणोती सागर निंबोरकर यांना नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन मा.खा.डॅा.नेते यांनी केले.