संविधान दिनानिमित्त आयोजित शिबिरात 101 जणांचे रक्तदान

'लॅायड्स' फाऊंडेशचे आयोजन

गडचिरोली : संविधान दिनानिमित्त नागरिकत्वाची जाणीव आणि मानवतेचा उत्तम नमुना सादर करत लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनतर्फे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोनसरी येथील लॉयड्स मेटल्सच्या परिसरात आयोजित या शिबिरात अनेक दाते रक्तदानासाठी पुढे आले. त्यातून तब्बल 101 युनिट्स रक्त गोळा करण्यात यश आले.

हे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील रक्तपेढीच्या पथकाने दिलेले वैद्यकीय सहकार्य आणि समन्वयामुळे हा उपक्रम सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे (LMEL) अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच लॉयड्स काली अम्मल हॉस्पिटलमधील आरोग्य तज्ज्ञ उपस्थित होते, ज्यातून कंपनीच्या समाजकल्याणासाठीच्या बांधिलकीची स्पष्ट झलक दिसून आली.

या प्रसंगी लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण यांनी कर्मचाऱ्यांना आणि सहभागी सर्वांना उद्देशून दिलेल्या संदेशात या उपक्रमाचे कौतुक केले. “आपल्या देशाची ओळख ठरवणाऱ्या मानवता, समता आणि करुणा या मुल्यांना आम्ही सलाम करतो. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण केवळ जीव वाचवत नाही, तर भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्यही निभावत आहोत,” असे म्हणत त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानून निःस्वार्थ सेवाभावाचे कौतुक केले.

अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. या यशस्वी रक्तदान शिबिरातून लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनने संविधानाच्या भावनेला अनुसरून समाजसेवेची ठोस उदाहरणे घडवण्याची आपली बांधिलकी आणखी दृढ केली आहे.