गडचिरोली : भाजपकडून नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन जिल्हा महामंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गीता हिंगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले. दुसरीकडे देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते यांनीही भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोन महिला पदाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपसाठी हा एक धक्का ठरला आहे.
गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदासाठी यावेळी भाजपमध्ये कधी नव्हे एवढी चुरस निर्माण झाली होती. पक्षात आधीच दोन प्रबळ दावेदार असताना निवडणुकीच्या तोंडावर दोन नवीन महिलांचे पक्षप्रवेश होऊन त्यांनी नगराध्यक्षपदावर दावा केल्याने अखेरपर्यंत कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता ताणल्या गेली होती. यातच आधार विश्व फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केल्याने तिकीट आपल्यालाच मिळेल अशी आशा लावून बसलेल्या गीता हिंगे यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा सादर केला. नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासही त्यांनी नकार दिला. पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या राजीनामा मागे घेण्यास तयार झाल्या नाही.
अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हेरून आपल्या पक्षात घेतले. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रा.राजू कात्रटवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशिल हिंगे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
देसाईगंजच्या शालू दंडवते काँग्रेसमध्ये
गडचिरोलीसह देसाईगंज नगर परिषदेत याही वेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव निघाले. त्यामुळे देसाईगंजमध्ये प्रशासकराज लागण्यापूर्वी नगराध्यक्ष असलेल्या शालू दंडवते यांना याही वेळी पक्षाची तिकीट मिळेल अशी आशा होती. पण तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष नामांकन भरले होते. त्यांचा अर्ज वैधही झाला होता, पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पक्षादेशानुसार अर्ज मागे घेतला. मात्र मनातील धुसफूस कायम होती. त्यातच काँग्रेसने त्यांच्या नाराजीचा फायदा घेत गळ टाकला. त्यात शालू दंडवते अलगद आल्या. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ.विजय वडेट्टीवार आणि आ.रामदास मसराम यांच्या उपस्थितीत शालू दंडवते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडली असली तरी भाजपवर त्याचा परिणाम होणार नाही. भाजप आता सागराप्रमाणे झाला आहे. त्यातून थोडे पाणी काढल्याने फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी दिली.
































